क्षयमुक्त आणि करोनामुक्त रुग्णांसाठी फिजिओथेरपीची सेवा

शैलजा तिवले

मुंबई : क्षयरोगामुळे क्षीण झालेल्या फुप्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी आणि क्षयरुग्णांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात आता फुप्फुस पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. हा विभाग मंगळवारपासून कार्यरत झाला असून येथील फिजियोथेरपी सुविधेचा फायदा करोनामुक्त रुग्णांनाही घेता येणार आहे.

काही क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी उशिरा आल्यामुळे त्यांची फुप्फुसे काही प्रमाणात निकामी होतात. काही रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये पाणी होते, सूज येते. क्षयरोग रुग्णालयातून बरे झालेल्या २० ते ३० टक्के रुग्णांच्या फुप्फुसांची क्षमता कमी झाल्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. थोडे चालले तरी धाप लागते. दैनंदिन कामे करण्यातही त्यांना अडचण येते. या रुग्णांनी फुप्फुसाचे काही व्यायाम नियमित केल्यास त्यांच्या फुप्फुसांची क्षमता वाढू शकते. या उद्देशाने हे पुनर्वसन केंद्र क्षयरोग रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागाच्या मदतीने या केंद्रामध्ये आवश्यक यंत्रे व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फिजिओथेरपी केंद्र सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू असेल. परंतु सध्या एकच फिजिओथेरपिस्ट उपलब्ध असल्यामुळे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू असणार आहे. रुग्णालयातील क्षयमुक्त परंतु फुप्फुसाचा त्रास असलेल्या रुग्णांना या केंद्रामध्ये उपचार दिले जातील. याव्यतिरिक्त शहरातील रुग्णांनाही येथे उपचार घेता येतील, अशी माहिती क्षयरोग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता भुई यांनी दिली.

करोनामुक्त रुग्णांसाठीही वापर

 करोनामुक्त झालेल्या आणि फुप्फुसांची क्षमता क्षीण झालेल्या, सतत धाप लागणाऱ्या रुग्णांसाठीही या केंद्रामध्ये उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाजवळच्या करोनामुक्त रुग्णांसाठीही ही सेवा उपलब्ध झाली आहे.

क्षयरोग रुग्णालयातील या फिजिओथेरपी केंद्राला प्रतिसाद चांगला मिळाल्यास उपनगरीय रुग्णालयांमध्येही अशी आणखी केंद्रे सुरू करण्यात येतील. जेणेकरून श्वसनाचे अन्य आजार असलेल्या रुग्णांनाही उपनगरामध्ये सुविधा उपलब्ध होईल.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

Story img Loader