दादर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोष्टाच्या इमारतीत अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विश्रामगृहाचा भार ४० वर्षांहूनही जुन्या इमारतीला पेलवेल का? अशी चर्चा पोष्ट खात्यात सध्या सुरू आहे. इमारतीची मजबुती, भार पेलण्याची क्षमता आदींची चाचपणी न करताच लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या आठ खोल्यांच्या शाही विश्रामगृहासाठी महापालिकेची परवानगीदेखील घेतली नसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
दादर येथील पोष्टाचीही पाच मजली इमारत १९७२ साली बांधण्यात आली आहे. सुमारे ४० वर्षे जुनी ही इमारत असल्यामुळे या इमारतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे फेरफार करायचे असतील तर त्यासाठी संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक आहे. तरीदेखील अधिकाऱ्यांची शाही व्यवस्था करण्यासाठी पोष्टाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता, आहे त्याच इमारतीमध्ये आणखी नवीन आठ खोल्या विश्रामगृहासाठी उभारल्या आहेत. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयेही खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या विश्रामगृहात अधिकाऱ्यांसाठी व्यायामशाळाही बनविण्यात आली आहे. या जुन्या इमारतीवर अशा पद्धतीने बोजा वाढविल्याने इमारतीला धोका होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे बांधकाम करीत असताना महापालिकेकडून परवानगी न घेता नियमबाह्य़ पद्धतीने हे विश्रामगृह उभारण्यात आल्याचे भारतीय डाक कर्मचारी संघाचे माजी सरचिटणीस मधुकर खांबूटकर यांनी सांगितले. १०० रुपयांत आप्तेष्टांसह राहण्याची उत्तम व्यवस्था मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने पोष्ट खात्याचा अधिकारी वर्ग मात्र खूश असल्याचे कर्मचारी सांगतात. या संदर्भात पोष्टाचे जनसंपर्क अधिकारी व्ही. ए. व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा