मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार? याविषयी सध्या चर्चा चालू आहे. त्यातच मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. माँ कांचनगिरी यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दोऱ्याविषयी सूतोवाच केले आहेत.
काय म्हणाल्या माँ कांचनगिरी?
माँ कांचनगिरी यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू सम्राट’ अशी उपमा दिली. “त्यांच्या आरोग्याविषयी मी चौकशी केली. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. त्यांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं आरोग्य चांगलं राहायला हवं. आज राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने ‘हिंदूसम्राट’ आपल्याला दिसतात. त्यामुळे मी त्यांना भेटायला आले”, असं माँ कांचनगिरी यावेळी म्हणाल्या.
राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार!
याआधी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. माँ कांचनगिरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला बळ मिळालं आहे. “राज ठाकरे अयोध्येला नक्कीच जातील. प्रकृती चांगली नसल्यामुळे ते अयोध्येला पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरू होईल. तुम्हाला फार लवकर याची बातमी मिळेल की ते अयोध्येला येत आहेत. रामलल्ला सगळ्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अयोध्येला येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही”, असं माँ कांचनगिरी यावेळी म्हणाल्या.
अजानच्या मुद्द्यावरून प्रवीण तोगडियांचं आव्हान चर्चेत!
दरम्यान, एकीकडे माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने हिंदूहृदयसम्राट दिसत असल्याचं नमूद केलेलं असताना दुसरीकडे अजानच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडियांनी राज ठाकरेंना दिलेलं आव्हान चर्चेचा विषय ठरत आहे. “सध्या राज्यात राज ठाकरेंच्या मित्रांचं सरकार आलं आहे. आता तुम्ही कधी आंदोलन करून अजान बंद करणार आहात? उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात आमचे राजभैय्या मैदानात आले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रभाऊंच्या राज्यातही राज ठाकरेंनी मैदानात यावं. आम्ही त्यांना साथ देऊ”, असं प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत.