मुंबई : गर्भवती महिलांना प्रसूतीपर्यंत आणि तत्पूर्वी काळजी व नियमित अंतराने समुपदेशन करण्यासाठी, तसेच मातांना एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या संपूर्ण लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माँ मित्र हेल्पडेस्क’चा लाभ वर्षभरामध्ये ३३ हजार ५२८ गर्भवती महिलांनी घेतला. या प्रकल्पामुळे मुंबईतील निरोगी आई आणि निरोगी बाळाचे ध्येय साधण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तीन वैद्यकीय महाविद्यालये, दोन प्रसूतीगृहे, सहा सर्वसाधरण रूग्णालये अशा ११ रुग्णालयांमध्ये जुलै २०२४ पासून अरमान या बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने ‘माँ मित्र हेल्पडेस्क’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील गर्भवती महिलांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘माँ मित्र हेल्पडेस्क’ सेवेचा जुलै २०२४ पासून आतापर्यंत ३३ हजार ५२८ गर्भवती महिलांनी लाभ घेतला.
या उपक्रमांतर्गत सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या प्रसूतीपर्यंत आणि तत्पूर्वी काळजी व नियमित अंतराने समुपदेशन करण्यात येते. एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या संपूर्ण लसीकरणासाठी मातांना नियमित दूरध्वनी केले जातात. तसेच अतिजोखमीची परिस्थिती असलेल्या गर्भवती महिलांच्या उपचारांचे पालन, ट्रॅकिंग आणि पाठपुरावाचा तपशील ‘माँ मित्र हेल्पडेस्क’मार्फत आरोग्य केंद्राला पाठविण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
वर्षभरात ३८ ‘माँ मित्र’ हेल्पडेस्क सुरू करणार
‘माँ मित्र हेल्पडेस्क’तर्फे गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि पाठपुरावा उत्तमरित्या केला जातो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि पाठपुरावा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३८ ‘माँ मित्र हेल्पडेस्क’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
किलकारी या कार्यक्रमाअंतर्गत समुपदेशन
गर्भधारणा झाल्यानंतर संबंधित महिलेने नजीकच्या आरोग्य केंद्रात नोंदणी करावी. प्रसूतीपूर्व देखभालविषयी माहिती करून घ्यावी. गर्भवती मातांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. या सर्व नोंदणीकृत गर्भवती महिलांचे केंद्र शासनाच्या किलकारी या कार्यक्रमाअंतर्गत विनामूल्य स्वयंचलित व्हॉईस कॉल आणि एसएमएसच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येते. त्यामुळे मुंबईतील निरोगी आई आणि निरोगी बाळाचे ध्येय साधण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
रक्तक्षय जनजागृतीसाठी ‘लाल रंग कमाल रंग’ मोहीम
मुंबई महानगरपालिकेमार्फत गरोदर मातांमधील रक्तक्षय कमी करण्याबाबत ‘लाल रंग कमाल रंग’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. माता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे.