खडीच्या कमतरतेमुळे रूळ तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ
मध्य रेल्वेवर गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेरुळांना तडे जाण्याच्या किंवा रूळ तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. गुरुवारी कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान लोकल घसरण्यामागे रेल्वेरुळाला तडा गेल्याचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये दुपारच्या व पहाटेच्या तापमानात प्रचंड तफावत असल्याने रुळांना तडे जात असल्याचे कारण अधिकारी देत असताना प्रत्यक्षात मध्य रेल्वेच्या रुळांखाली खडीचा मोठा अभाव असल्याने या घटना घडत असल्याचे समजते. उपनगरीय क्षेत्रात रुळांखाली २५० ते ३०० मिमी जाडीचा खडीचा थर असणे अपेक्षित असताना सध्या अनेक भागांमध्ये हा थर १०० ते १५० मिमी एवढा कमी आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अनेक भागांमध्ये रुळांखालील खडीचा हा थर फक्त १०० ते १५० मिमी एवढाच असल्याचे रेल्वेतील काही अधिकारीच सांगतात. रेल्वेच्या परिभाषेत ‘सेक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन स्थानकांदरम्यानच्या भागांमध्ये दर वर्षी १.५ लाख घनमीटर एवढी खडी बदलली जाणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मध्य रेल्वेवर सध्या एक लाख घनमीटर एवढय़ा खडीचाही पुरवठा होत नाही, असे रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
रुळांवर खडी पसरण्याचे काम रेल्वेच्या अभियंता विभागाकडून होत असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात जासई, तळोजा, कर्जत, कल्याण आणि तुर्भे या पाचच ठिकाणची खडीची आगारे (डेपो) सुरू आहेत.
गुरुवारी कल्याणजवळ रुळाला तडा गेल्यामुळेच कुल्र्याहून अंबरनाथला जाणारी गाडी घसरल्याचा अंदाज आहे. भविष्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अशा आणखी घटना घडू शकतात. गुरुवारच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाडी रुळांवरून घसरणे हे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे असल्याचेही या अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.
नियम पायदळी
रेल्वे वाहतुकीत गादीसारखे रुळांवरील ताण दूर करण्याचे काम ही खडी करते. रेल्वेरूळ कितीही मजबूत असले, तरी या रुळांखालील माती आणि खडीचा पाया भक्कम नसल्यास रुळांना धोका असतो. त्याशिवाय रुळांवर पडणारे पाणी वाहून जाण्यासाठीही योग्य सोय असणे अपेक्षित असते. कोणत्याही प्रदेशात रुळांची परिस्थिती उत्तम राहण्यासाठी त्यांच्याखालील स्लिपर्समध्ये किमान २५० ते कमाल ३०० मिमी एवढय़ा जाडीचा खडीचा थर असला पाहिजे, असे रेल्वेच्या नियमावलीतच म्हटले आहे. त्याशिवाय रुळांखालून पाणी वाहून जाण्यासाठीचा योग्य मार्ग बनवण्याची गरज असते.