प्रख्यात ‘चाटे कोचिंग क्लासेस’चे मालक मच्छिंद्र चाटे (५२) यांना एका विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी गुरुवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. दादर येथील कार्यालयात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांचावर आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
चाटे क्लासेसच्या सायन शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याबद्दल तक्रार होती. नोव्हेंबरनंतर वर्ग अनियमित होत असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याचा त्यांचा आरोप होता. त्यासंदर्भात बुधवारी चाटे क्लासेसच्या दादर पूर्व येथील मुख्यालयात सायन शाखेचे विद्यार्थी, पालक आणि चाटेच्या व्यवस्थापनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर संध्याकाळी ही पीडित तरुणी इतर पाच विद्यार्थी आणि काही पालक चाटे यांना त्यांच्या केबीनमध्ये भेटायला गेले होते. अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून लेक्चर्स नियमित होत नव्हती, त्याबद्दल त्यांनी चाटे यांना जाब विचारला होता. यावेळी संतप्त झालेल्या चाटे यांनी शिवीगाळ करत फिर्यादी मुलीचा ड्रेस खाली खेचला, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकारानंतर केबीनबाहेर असलेल्या तिच्या काकांनी चाटे यांना मारहाणही केली. या प्रकारानंतर ही पीडित मुलगी आणि पालकांनी भोईवाडा पोलिसांत चाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी उपस्थित इतर विद्यार्थी आणि पालकांचे जबाब नोंदवून बुधवारी उशीरा चाटे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. चाटे यांना मारहाण करणाऱ्या या फिर्यादी मुलीच्या काकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दिली. गुरुवारी दुपारी मच्छिंद्र चाटे भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा