इंद्रायणी नार्वेकर
समुद्रमार्गे अवाढव्य यंत्र भारतात दाखल; ७० ट्रेलरच्या साहाय्याने प्रकल्पस्थळी आणणार
ऐन टाळेबंदीत मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग या प्रकल्पासाठी बोगदा खणण्याकरिता चीनमधून ‘टनेल बोअरिंग मशीन’ मुंबईत दाखल झाले आहे. चीनमधील टाळेबंदी संपल्यानंतर समुद्रमार्गे हे अवाढव्य यंत्र आले आहे. ७० ट्रेलरच्या साहाय्याने या यंत्राचे भाग प्रियदर्शिनी उद्यानाजवळ आणले जात आहेत.
देशातील हे सर्वात मोठे टीबीएम यंत्र आहे. जमिनीखालीच त्याचे सुट्टे भाग जोडले जाणार आहेत. त्याकरिता चीन किंवा सिंगापूरहून तंत्रज्ञ आणावे लागणार आहेत. मात्र परदेश प्रवास बंद असल्यामुळे हे कामही रखडणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल त वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक या दरम्यान ९.९८ किमीचा सागरी रस्ता बांधण्यात येणार आहे. या सागरी मार्गामध्ये भराव, पूल, बोगदे असे गुंतागुंतीचे बांधकाम आहे. त्यात ३.४५ किलोमीटरचे दोन समांतर बोगदे खणण्यात येणार आहेत. हे बोगदे खणण्यासाठी १२.२० मीटर व्यासाचे टनेल बोअरिंग मशीन खास चीनहून आणण्यात आले आहे.
चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर चीनमधील सर्वच प्रकारची आयात थांबवलेली असल्यामुळे हे मशीन आणण्याचे कामही लांबणीवर पडले होते. मात्र चीनमधील परिस्थिती निवळल्यानंतर हे यंत्र जहाजाने मुंबईत आणण्यात आले आहे. साधारण एक महिन्याचा प्रवास करून हे जहाज मुंबई बंदरात दाखल झाले आहे.
१०० भाग आणि ७० ट्रेलर
या अवाढव्य यंत्राचे एकूण १०० भाग असून ते मुंबई बंदरात उतरवण्यात आले आहेत. हे भाग ट्रेलरच्या साहाय्याने प्रियदर्शिनी उद्यान येथील प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्याचे काम सुरू आहे. यातील सर्वात मोठा भाग हा अडीचशे टनांचा आहे. १०० ते २०० टनांचे हे भाग नेण्यासाठी ट्रेलरच्या ७० फेऱ्या लागणार आहेत. आतापर्यंत ४५ फेऱ्या झाल्या असून अजून ३० टक्के भाग जागेवर आणायचे आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टाळेबंदीमुळे सध्या रस्ते मोकळे असल्यामुळे यंत्राच्या सुट्टय़ा भागांची वाहतूक करणे सोपे जात आहे.
समुद्राच्या खालून बोगदे
* प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी रस्त्यावर प्रत्येकी ३.४५ किलोमीटरचे दोन बोगदे (टनेल) समुद्राच्या खालून असणार आहेत.
* या बोगद्यावर वाहनांसाठी तीन मार्गिका असतील. हे बोगदे मेट्रो रेल्वेसाठी खणलेल्या बोगद्यांपेक्षा मोठे असतील.
* मेट्रो रेल्वेपेक्षा या बोगद्यांचा व्यास मोठा आहे. मेट्रोच्या बोगद्याचा व्यास हा पाच ते सहा मीटरचा आहे तर सागरी मार्गाच्या बोगद्याचा व्यास ११ ते १२ मीटरचा आहे.
* मरिन ड्राइव्ह, मलबार हिल व प्रियदर्शिनी पार्क येथे हे बोगदे बांधण्यात येतील.
* प्रियदर्शिनी पार्क येथून बोगदा खणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एकूण १३,००० कोटींच्या या प्रकल्पासाठी पालिकेने अर्थसंकल्पात २००० कोटींची तरतूद केली आहे.
* २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.