मुंबईत हक्काचे घरकुल असावे, ही भाबडी आशा घेऊन अंधेरी, वसई, ठाणे, कर्जत-कसाराच नव्हे, तर अगदी वापीपर्यंतच्या हजारो लोकांनी आज दुसऱ्या दिवशीही मंत्रालयात धाव घेतली. पवईत घरांची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी करुनही मंत्रालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली. त्यांना प्रवेश न दिल्याने मंत्रालयासमोरील महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या कार्यालयात हजारो अर्ज गोळा करण्यात आले असून ते मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार आहेत. दुर्बल घटकांना हक्काच्या घरासाठी हे ‘अभिनव आंदोलन’ सुरूच राहील, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
पवईत दुर्बल घटकांसाठी ५४ हजार रुपयांमध्ये घरे उपलब्ध नाहीत आणि त्यांच्या वाटपाची कोणतीही योजना नाही. बोगस अर्जवाटप सुरू असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले. तरीही त्यावर विश्वास न ठेवता हजारो लोकांनी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासूनच मंत्रालय परिसरात धाव घेतली. त्यात महिलांचे प्रमाणही मोठे होते.
अर्ज घेऊन येणाऱ्यांची गर्दी पाहून मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी अर्ज न स्वीकारण्याचे ठरविले. मंत्रालयाचे सर्व दरवाजे बंद करून हे अर्ज घेऊन येणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मोठय़ा प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले.
मंत्रालयात प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी सकाळी ११ च्या सुमारास सौम्य छडीमार करूनही लोक पांगले नाहीत. हजारो लोकांनी मंत्रालय परिसरातील फूटपाथवर ठाण मांडले. अर्जाच्या छायाप्रती काढून वाटल्या जात होत्या व अनेकजण हे अर्ज भरण्यास मदतही करीत होते. अर्ज सादर करण्याचे काम आघाडीच्या कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. गर्दीमुळे मंत्रालय परिसरात वाहतूक कोंडी झाली.
सर्वाचाच सहभाग व अर्जाची विक्री
केवळ ५४ हजार रुपयांमध्ये घर मिळत असेल, तर कोणीही मागे राहणार नाही, हे लक्षात घेऊन अनेकांनी अर्जविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अगदी १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत हे अर्ज गेल्या काही दिवसांत विकले जात होते. सार्वजनिक बांधकाम विभागापासून सर्व शासकीय विभागांमध्ये वर्ग ३ व ४, पोलिस, महापालिका सफाई कर्मचारी व अन्य विभागांमधील कर्मचारी यांनीही घरांसाठी अर्ज सादर केले आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहून अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही पुढे आले व त्यांनी अर्ज भरून देण्यासही मदत केली.
रेल्वेस्थानकांवर उद्घोषणा
मंत्रालयापुढे गर्दी वाढत आहे, लक्षात आल्यावर पोलिस दल मोठय़ा संख्येने वाढविण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कर्जत-कसारा, पनवेल आणि विरापर्यंत सर्व स्थानकांवर घरयोजनेची अफवा असून लोकांनी मंत्रालयाकडे जाऊ नये, अशा उद्घोषणा करण्यात येत होत्या.
कदम, तंबी अन् निर्मलादेवीही..
स्वस्तात घर मिळणार आहे, अशी आशा दाखविल्याने सर्व जातीधर्मातील आणि मराठी व परप्रांतियांनीही मंत्रालय परिसरात धाव घेतली. अंधेरीला राहणारे कदम आपल्या कुटुंबियांसह तेथे आले होते. तंबी हा गेली १० वर्षे मुंबईत असून महापालिका कर्मचाऱ्यांचे अर्ज तो गोळा करीत होता व आघाडीच्या कार्यालयात नेऊन देत होता.
झेरॉक्स सेंटरवर संक्रांत
छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून मंत्रालय परिसरातील छायाप्रती काढणाऱ्या सर्व दुकानदारांना घरयोजनेच्या अर्जाच्या छायाप्रती काढू नयेत, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मंत्रालयासमोरील स्टेशनरी व छायाप्रती काढण्याचे एक अनधिकृत दुकान महापालिकेने दुपारी कारवाई करून पाडले. तेथे या अर्जाच्या छायाप्रती काढल्या जात होत्या, असे समजते.