मुंबई : साध्या अपघातामुळे सुरू झालेल्या वेदनांनी ७० वर्षीय मादागास्करच्या रुग्णाला जीवघेण्या आजाराची चाहूल लागली. दोन महिन्यांहून अधिक काळ असह्य पोटदुखी सहन केल्यानंतर रुग्ण थेट मादागास्कर येथून मुंबईच्या मसीना रुग्णालयातउपचारासाठी दाखल झाले. तेथे त्यांच्यावर यशस्वी स्टेंट ग्राफ्टिंग उपचार करण्यात आला. व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत सोनी आणि डॉ. अशांक बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ही आधुनिक आणि कमी वेदनादायक प्रक्रिया पार पडली.

फिर्दोशे हौसेन (७०) हे मादागास्करमधील रहिवासी. काही महिन्यांपूर्वी ते बेडवरून पडले, आणि त्यानंतर त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. दोन महिने हा त्रास सहन करूनही कोणताही आराम न मिळाल्याने त्यांचे दैनंदिन आयुष्य कठीण झाले. त्यांच्या मातृदेशात अत्याधुनिक उपचार उपलब्ध नसल्यामुळे, डॉक्टरांनी त्यांना भारतात जाण्याचा सल्ला दिला. डॉ. झैनुलअबेदीन हमदुलाय यांच्या मार्गदर्शनाखाली ते मुंबईत आले आणि मसीना रुग्णालयात दाखल झाले.

डॉ. अशांक बन्सल यांनी सांगितले, “रुग्ण दीर्घकाळ धूम्रपान करत असल्यामुळे आणि पोटदुखी तीव्र होत चालल्याने आम्ही त्यांची सीटी अँजिओग्राफी केली. तपासणीत ‘ऍब्डॉमिनल एऑर्टिक अॅन्युरिझम’ (पोटातील मुख्य रक्तवाहिनीत फुगवटा) असल्याचे निदान झाले. हा विकार अत्यंत गंभीर असून वेळेवर उपचार न झाल्यास रक्तस्राव होऊन मृत्यू होऊ शकतो. उच्च रक्तदाब, धूम्रपान, अनुवंशिकता आणि रक्तवाहिन्यांमध्ये संकोचनामुळे हा आजार निर्माण होतो. दुर्दैवाने, अनेक रुग्णांना तो अगदी शेवटच्या टप्प्यातच समजतो.”

रुग्णाची स्थिती पाहता नुकतीच त्यांच्यावर स्टेंट ग्राफ्टिंग प्रक्रिया करण्यात आली. डॉ. बन्सल म्हणाले, “ही प्रक्रिया पारंपरिक शस्त्रक्रियेसाठी एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक शस्त्रक्रियेत मोठा टाका, रक्तस्राव आणि दीर्घकालीन रुग्णालयीन काळजी आवश्यक असते. मात्र, स्टेंट ग्राफ्टिंगमध्ये फक्त एक सेंटीमीटकच्या उपकरणाचा उपयोग करून रक्तवाहिनीत स्टेंट बसवला जातो. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि फुगवटा फुटण्याचा धोका टळतो. या पद्धतीने उपचार घेतल्यानंतर रुग्ण केवळ एकाच दिवसात चालू शकतो आणि दोन दिवसांतच घरी परतू शकतो. या रुग्णालाही दुसऱ्याच दिवशी चालता येऊ लागले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

रुग्णाची मुलगी फातेमा फिरदोस जावेर म्हणाल्या, “वडिलांनी दोन महिने प्रचंड वेदना सहन केल्या. मादागास्करमध्ये अशा प्रकारचे आधुनिक उपचार मिळत नाहीत, त्यामुळे भारतात येण्याचा निर्णय घेतला. डॉ. अशांक बन्सल आणि डॉ. झैनुलअबेदीन हमदुलाय यांची भेट आमच्यासाठी एक आशेचा किरण ठरली. उपचार जलद आणि यशस्वी झाले. वडील आता पूर्णपणे बरे होत असून, आम्ही डॉक्टरांचे आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानतो. ही घटना धूम्रपानासारख्या सवयींमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचे वास्तव दाखवणारी आहे. ऍब्डॉमिनल एऑर्टिक अॅन्युरिझम हा आजार अनेकदा सुरुवातीला लक्षात येत नाही, त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास जीव वाचवणे शक्य होते असे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader