सहाय्यक पोलीस आयुक्त वसतं ढोबळे यांनी फेरीवाल्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मदन जैस्वाल यांच्या मुलीचाही रविवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. जंतुसंसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे केईएमच्या डॉक्टरांनी सांगितले.
मागील आठवडय़ात वाकोला येथे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेच्या मदतीने कारवाई सुरू केली होती. १० जानेवारीला वाकोला येथे कारवाई सुरू असताना तेथून पळून जाणाऱ्या मदन जैस्वाल या फेरीवाल्याचा मृत्यू झाला होता. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जेजे रुग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. जैस्वाल यांच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंबिय वाराणसीहून मुंबईत आले होते. मुंबईत येण्याआधीपासून त्यांची २२ वर्षांची मुलगी राधा ही तापाने आजारी होती. तिच्यावर अंधेरी येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू होते.
प्रकृती खालावल्याने तिला अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  प्रकृती अधिक खालावल्याने तिला दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जंतूसंसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे केईएमच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader