मढ येथील समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत दुर्मिळ ‘लॉगहेड’ कासव सापडले असून ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात या कासवावर उपचार सुरू आहेत. कासव बरे झाल्यानंतर ‘फ्लिपर टॅगिंग’ करून त्याला सुरक्षितस्थळी सोडण्यात येणार आहे.मढ येथील सिल्व्हर किनाऱ्यावर १७ ऑगस्ट रोजी स्थानिक मच्छिमारांना मादी ‘लॉगहेड’ कासव जखमी अवस्थेत आढळले होते. लहान बोटीने जोरदार धडक दिल्याने कासवाचे कवच तुटल्याचे निदर्शनास आले आहे. या कासवाला स्थानिक पोलीस आणि कांदळवन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी ऐरोलीतील केंद्रात दाखल केले असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या या केंद्रात कासवावर उपचार सुरू आहेत. कासव बरे झाल्यानंतर त्याला ‘टॅगिंग’ करण्यात येणार आहे. कांदळवन कक्षाचा इ-मेल कोरलेली धातूची एक छोटी पट्टी व इतर नोंदी असलेला टॅग कासवावर बसविण्यात येणार आहे. त्यानंतर हे कासव सुरक्षितस्थळी सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रातील कासवाची तपासणी करण्यात आली. कासवाचे कवच थोडे तुटले आहे. त्याला न्यूमोनिया झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या मादी ‘लॉगहेड’ कासवावर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याची कोणतीही योजना नाही. मात्र, कासव बरे झाल्यावर त्याच्या सामान्य नोंदणीसाठी ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही किनारी भागात हे कासव आढळून आल्यास त्याच्या मार्गक्रमणाचा अंदाज बांधता येईल, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्रातील भ्रमंतीचा अभ्यास करण्यासाठी पाच मादी कासवांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवला होता. मात्र, हे ट्रान्समीटर बंद पडल्याने हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. तसेच मढ येथे सापडलेल्या कासवाला सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याऐवजी सामान्य नोंद ठेवणारा ‘फ्लिपर टॅग’ लावण्यात येणार आहे.