भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते भांडारी यांची टीका

राफेल विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल केल्याबद्दल आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शनिवारी पनवेल येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते.

या वेळी भांडारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाने विमानांच्या खरेदीची प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनरची निवड याबाबतीत विचार करून कोणताही गरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांना बोफोर्स तोफा खरेदी गरव्यवहारामुळे सत्ता गमवावी लागली. तशाच प्रकारे सध्याच्या पंतप्रधानांना घेरण्याचा निर्थक प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयानेच काँग्रेस पक्षाचा प्रयत्न हाणून पाडला.

Story img Loader