मुंबई : आध्यात्मिक आणि धार्मिक विषयांवरील पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेले गिरगावातील ‘बलवंत पुस्तक भांडार’चे मालक आणि प्रकाशक माधव त्रिंबक परचुरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
लहानपणापासूनच पुस्तकांच्या सान्निध्यात रमलेल्या माधव परचुरे यांच्या वडिलांनी १९०१ साली परचुरे पुराणिक आणि मंडळी या नावाने माधवबाग येथे पुस्तक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे १९४४ साली त्यांच्या वडिलांनी आणि चुलत बंधू यांनी मिळून बलवंत पुस्तक भांडारची सुरुवात केली. नंतर चुलत बंधू या व्यवसायातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे प्रकाशन व्यवसाय सुरू केला. माधव परचुरे यांनी १९६८ साली मयूरेश प्रकाशन ही स्वत:ची प्रकाशन संस्था सुरू केली. त्यांनी आपल्या प्रकाशन संस्थेंतर्गत आध्यात्मिक, मन:शांती देणाऱ्या साहित्यावर आधारित पुस्तक प्रकाशनावर भर दिला. तणावमुक्तीचे उपाय सुचवणारी पुस्तके, संगीत, योग, ज्योतिष आदी विविध विषयांवरील पुस्तके मिळण्याचे हे ठिकाण होते.