‘महिलांची सुरक्षितता’ या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटय़-चित्रपट अभिनेत्री मधु कांबीकर यांची निवड करण्यात आल्याचे संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व महिला आणि बाल विकासमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केले.
राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ११ व १२ ऑक्टोबर रोजी नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहात अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे बीजभाषण विदर्भातील लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. प्रतिमा इंगोले करणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, तर समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला सायंकाळी होईल.
‘संत कवियित्रींची बंडखोरी’, ‘महिलांची सामाजिक सुरक्षितता : एक भान’, या विषयांवर संमेलनात परिसंवाद आयोजित केलेले असून त्यात डॉ. अरुणा ढेरे, डॉ. आशा सावदेकर, चंदाबाई तिवाडी, सुनीता कोंडबतुलवार, डॉ. अल्का चिडगोपकर, सीमा साखरे, रझिया सुलताना, डॉ. उर्मिला पवार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सहभागी होणार आहेत.