मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने सीएसआरच्या मदतीने राज्यात दोन मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत. पहिल्या हनी पार्कचे महाबळेश्वर येथील मध संचालनालयात मंगळवारी (४ फेब्रुवारी) उद्घाटन होत आहे, तर दुसरे मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने सीएसआर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एव्हरेस्ट मसाले यांनी दिलेल्या सहा लाखांच्या सीएसआर निधीमधून महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी पार्क उभारला आहे. या पार्कमध्ये ३० मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधपेट्यांसह मध संकलन यंत्र, मध प्रक्रिया, स्वार्मनेट, राणी माशी पैदास उपकरण, पोलन ट्रॅप, ॲटी वेल एंड फिंडिंग, बी व्हेल आदी उपकरणे ठेवण्यात येणार आहेत. मधमाश्यांचा अभ्यास करण्यासाठी येणारे शेतकरी, मधपाळ, शालेय सहलींमधून येणारे विद्यार्थी आणि पर्यटक आदींना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची सर्व माहिती प्रात्यक्षिकांसह मिळणार आहे. महाबळेश्वर येथील मध संचालनालय एक्सलन्स सेंटर व्हावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

मुंबईतील बोरिवली येथील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानात दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्यात येणार आहे. मधुबन हनी पार्कसाठी जागानिश्चिती सुरू आहे. उद्यानात पर्यटक, सहली मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे संबंधितांना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची माहिती मिळणार आहे. उद्यानात माकडांची संख्या जास्त आहे. शिवाय पावसाळ्यातील संभाव्य समस्या आणि फुले अथवा मकरंदाची उपलब्धता पाहून स्थळनिश्चिती केली जात आहे. महाबळेश्वर येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्यानात कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे रोजगाराची गरज असलेल्या आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केली जाणार आहे.

महाबळेश्वर येथे देशात एकमेव स्वतंत्र मध संचालनालय आहे. या संचालनालयास सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याचे नियोजन आहे. त्या दिशेने मधुबन हनी पार्क हे पहिले पाऊल आहे. खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून मध उत्पादनाला गती दिली जात आहे. – रवींद्र साठे, सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

Story img Loader