मुंबई : ‘सहा एप्रिल १९८६ ची रात्र होती. भारत-पाकिस्तान हॉकीचा सामना होता. मी रस्त्यावर उभा होतो. तेवढय़ात टोपी घालून तो तेथे आला. मी त्याला मागून पकडले आणि म्हणालो, यू चार्ल्स!’.. कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजला दोन वेळा पकडणाऱ्या मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी मधुकर झेंडे यांच्यासमोर तो दिवस अजूनही स्पष्ट उभा राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाने चार्ल्स शोभराजच्या मुक्ततेचे आदेश दिल्यानंतर या कुख्यात ‘बिकीनी किलर’चे कारनामे आणि त्याला एकदा नव्हे तर दोनदा अटक करणरे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे यांच्या धाडसाच्या आठवणी जाग्या झाल्या.‘‘मी शोभराजला १९७१ मध्येही अटक केली होती. त्यावेळी तो एवढा मोठा गुन्हेगार नव्हता. तो मुंबईला पळून आला होता.  त्यावेळी त्याला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र, तेथून तो पळाला आणि परदेशात जाऊन महिलांच्या हत्या करू लागला,’ असे झेंडे यांनी सांगितले. १९८६मध्ये तिहार तुरुंगात असताना शोभराजने केकमध्ये गुंगीचे औषध टाकून सुरक्षा रक्षकांना बेशुद्ध केले आणि १५ कैद्यांसह पळ काढला. हे सर्व गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी शोभराजला अटक करण्यासाठी मधुकर झेंडे यांना गोव्यात धाडण्यात आले. 

‘ ६ एप्रिल १९८६ ला भारत-पाकिस्तानचा हॉकीचा सामना होता. त्यावेळी मी रस्त्यावर उभा असताना एक व्यक्ती दुचाकीवरून टोपी घालून आला. मी जवळ गेलो. त्याला ओळखले आणि मागून पकडले,’ अशी आठवण झेंडे यांनी सांगितली. चार्ल्स कराटे ब्लॅक बेल्ट असल्याने तो पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधून मुंबईत आणला, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar zende shares how he arrested serial killer charles sobhraj in a goa restaurant zws