आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका स्थानिक नगरसेवकाला अटक केली. जुनैद अनिस खान ऊर्फ सोनू असे या नगरसेवकाचे नाव असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी सिम विक्रेता अंकित महेंद्रकुमार आणि त्याचा मित्र संजय अशोक चावडा या दोघांना अटक केली होती. 

तक्रारदार संपत बबन नागरे हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहेत. २६ ऑगस्टलात्यांना अर्जुन जैन नावाच्या एका व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. तो एका फॉरेक्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्याने गुंतवणुकीवर दररोज दोन ते तीन टक्के देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे डीमॅट खाते उघडून सुरुवातीला १० हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांच्या खात्यात नफा जमा झाला. पण तो नफा त्यांना काढता आला नाही. अखेर तक्रारदार यांनी कंपनीशी संबंधित व्यक्तींशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी आणखी रक्कम जमा करण्यात सांगितली. त्यानुसार तक्रारदार यांनी थोडे थोडे करून चार लाख ८५ हजार रुपये जमा केले. त्यानंतरही त्यांना रक्कम काढता आली नाही. अखेर त्यांनी याप्रकरणी पायधुनी पोलिसांकडे तक्रार केली.

तपासानंतर पोलिसांनी महेंद्रकुमार या सिमकार्ड विक्रेत्यासह संजय चावडाला आणि जुनैद खान यांना अटक केली. जुनैद हा मध्य प्रदेशच्या सिहोरमधीलनगरसेवक आहे. त्याने शुभमच्या मदतीने तिथे कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांना गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातला जात होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh local corporator arrested in cyber fraud case zws