मुंबई : ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील लगतचा रस्ता खचलेल्या मागाठाणे मेट्रो स्थानकाची आयआयटीतील तज्ज्ञांनी तपासणी केली. आता लवकरच आयआयटीकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे. हा अहवालातील शिफारसीनुसार एमएमआरडी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.
सुरक्षेच्यादृष्टीने बंद करण्यात आलेले उत्तरेकडील प्रवेशद्वार, सरकता जिना आणि उद््वाहक त्यानंतर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल. मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी मागाठाणे मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळचा रस्ता खचल्याने हा भाग बाधित झाला. त्यामुळे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) बाधित परिसर प्रवाशांसाठी बंद केला आहे. या परिसराची आयआयटीच्या तज्ज्ञांनी तपासणी केल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. आता एमएमआरडीएला आयआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.