उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्समध्ये अजिनोमोटो व शिशाचे प्रमाण अधिक आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मॅगीची पाकिटे तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. याबाबत दोन दिवसात माहिती हातात येणार असून त्यानंतर मॅगीचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान शिशाचे प्रमाण अधिक आढळलेल्या मॅगीच्या बॅचमधील सर्व पाकिटे नेस्लेने बाजारपेठेतून माघारी घेतली.
मॅगीमधील शिशाचे प्रमाण जास्त असल्याची चर्चा देशभर वेगाने पसरली. राज्यातील अन्न व औषध प्रशासनाकडूनही याची दखल घेतली गेली. राज्याच्या प्रमुख शहरातून मॅगीची पाकिटे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. मॅगीमध्ये असलेल्या मोनोसोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) तसेच शिशाचे प्रमाण मान्यतेपेक्षा अधिक आढळल्यास त्यानंतर मॅगीवर कारवाई होऊ शकते. तपासणीचे अहवाल दोन दिवसात मिळणे अपेक्षित असून त्यानंतर मॅगीबाबत निर्णय घेतला जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.   
दरम्यान मॅगीमध्ये अजिनोमोटो वापरत नाही, मात्र त्यातील घटक पदार्थामध्ये ते असेल, असे स्पष्टीकरण नेस्लेकडून देण्यात आले आहे.

Story img Loader