मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव -बदलापूर नगर परिषद यांची संयुक्त परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला.
संयुक्त परिवहन सेवेद्वारे मुंबई महानगर परिसरासाठी रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकात गुजराती भाषेत तिकीट ?
या भागातील लोकांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना रास्त भाडयात वाहतूक सेवा मिळणार आहे. तसेच या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिक असलेली भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगांव बदलापूर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
शहाडला परिवहन भवन
या संयुक्त परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे संयुक्त परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्युत बस प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नव्या विद्युत बसगाडयांचा समावेश करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे किंवा कमी करणे शक्य होईल.