मुंबई : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘महा वाचन उत्सव’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना रोज किमान १० मिनिटे वाचनासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये राज्यातील १ कोटी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असून, अवघ्या काही दिवसांमध्ये या उपक्रमासाठी नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.
वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांचा पुस्तके, वर्तमानपत्रे, साहित्य, आत्मचरित्र, काव्य वाचन करण्याकडे कल कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने (एमपीएसपी) राज्यातील इयत्ता तिसरी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा वाचन उत्सव’ उपक्रम हाती घेतला आहे. १६ ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी दररोज १० मिनिटे अवांतर वाचन करावे, त्यानंतर त्याचे आकलन करून न बघता ते कागदावर लिहून काढावे. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच त्यांची आकलन क्षमता वाढीस मदत होणार आहे.
या उपक्रमातून राज्यभरातून तीन विद्यार्थ्यांची विजेता म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (एमपीएसपी) प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली. राज्यातील १ लाख ८ हजार २५८ शाळांपैकी ९५ हजार १४४ शाळांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमधील १ काेटी ७३ लाख ४६ हजार ४१ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख २० हजार ५१६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर दोन्ही जिल्हे मिळून ९६ हजार ९७ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यातून ७२ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यातून या उपक्रमाला फारच कमी प्रतिसाद मिळाला असून पुण्यातील १६ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ६० हजार ६१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अहमदनगर ५३ हजार ५८१, छत्रपती संभाजी नगर ४८ हजार ४६९, पालघर ४६ हजार ३३५ आणि कोल्हापूर ४० हजार ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नंदुरबार ५ हजार ११७, गोंदिया ६ हजार ३१९ आणि हिंगोली ८ हजार २५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
हेही वाचा – मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक
विजेत्यांची होणार निवड
राज्यातील प्रत्येक शाळेतून तीन विद्यार्थ्यांची निवड तालुका पातळीसाठी केली जाणार आहे. त्यानंतर त्यातून जिल्हास्तरासाठी तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधून तीन विजेत्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. उत्तम वाचन असलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आर. विमला यांनी सांगितले.