मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना सामावून घेताना त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडी नेत्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
हेही वाचा >>> शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आशा पल्लवित झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. यासाठीच विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध छोट्या पक्षांना सामावून घेण्यात येणार आहे. या पक्षांसाठी ठरावीक जागा सोडण्यात येणार आहेत. जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेले विधानसभेचे अधिवेशन पार पडल्यावर महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच विधान परिषदेच्या तिन्ही जागा जिंकण्याकरिता आपापसात अधिक समन्वय वाढविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसकडे असलेली अतिरिक्त मते ठाकरे गट आणि शेकापचे जयंत पाटील यांना विभागून दिली जाणार आहेत.