मुंबई : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची लवकर नेमणूक करण्याची मागणी सोमवारी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेता नियुक्तीबाबत नियमानुसार विचार करुन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची आवश्यकता नसून तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे ) गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. मात्र अधिवेशन संपण्यास दोन दिवस शिल्लक असतानाही विरोधी पक्षनेत्याची घोषणा होत नसल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे या विषयाकडे लक्ष वेधले. संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यातील एक चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी.

राज्यात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये यासाठी लवकर विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली. अध्यक्ष नार्वेकर यांनी, सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून त्यासाठी उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल, छाननी आणि माघार ही सर्व प्रक्रिया उद्या पार पडणार असून बुधवारी नवीन उपाध्यक्षांची घोषणा होईल. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला आले आहे. उपाध्यक्षपदासाठी पक्षात संजय बनसोड, राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे या तिघांच्या नावांची चर्चा आहे. यापैकी पिंपरीच्या बनसोडे यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जाते.