भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न आदी मुद्दय़ांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधात महाविकास आघाडीतर्फे शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध समविचारी पक्ष, डावे पक्ष, विविध संघटनांच्या वतीने जे. जे. रुग्णालयाजवळील रिचर्डसन क्रुडास कंपनी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघेल.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात जनतेनेही मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत विदग्रस्त वक्तव्य केल्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संतप्त भावना आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड या भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. मोर्चात राज्यपाल हटाव मागणी केली जाणार आहे.
मोर्चा आझाद मैदानाजवळ पोहचल्यावर त्याचे सभेत रुपांतर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे होतील. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे जाहीर सभेत सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात आले. हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता शिवसेनेने सारी ताकद पणाला लावली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा यशस्वी होण्याकरिता स्वत: लक्ष घातले आहे. महिला आघाडी तसेच शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणावर मोर्चात सहभागी होण्याचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने ठाणे, पुणे, रायगडमधून मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याची सूचना केली आहे. सुमारे लाख ते दीड लाख लोक मोर्चात सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणारा मोर्चा हा भाजपची झोप उडविणारा असेल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
अठराशे पोलीस तैनात
मुंबई : महाविकास आघाडीने शनिवारी (१७ डिसेंबर) काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात मदतीसाठी अधिक संख्याबळ मागवण्यात आले आहे.
जेजे फ्लायओव्हर ते सीएसएमटीपर्यंत निघणाऱ्या मोर्चासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३१७ अधिकाऱ्यांसह एकूण १८७० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) २० तुकडय़ा आणि दंगल नियंत्रण पोलिसांची सुमारे तीन वाहने तैनात करण्यात येणार आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आठ पोलीस उपायुक्त आणि दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. भायखळय़ाजवळ शुक्रवारी संध्याकाळपासून सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.
मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी १३ अटी घातल्या आहेत. त्यात रिचर्डसन्स क्रुडास मिल ते सीएसएमटीपर्यंत मोर्चाची परवानगी देण्यात आली आहे. मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये, असेही सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी, अशा अटींचा समावेश आहे.