मुंबई : बदलापूरात शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यात आला. मात्र, राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दादरमधील शिवसेना भवनजवळ आंदोलन केले. त्यावेळी सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मुसळधार पावसानेही हजेरी लावली. यावेळी अनेक कार्यकर्ते धो – धो पावसात भिजत घोषणाबाजी करत होते.

डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेऊन धो – धो पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे माजी महापौर, आमदार, खासदार, नेते व कार्यकर्ते हे आंदोलनात सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनचा परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा…मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

चिमुरडीला न्याय द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, मिंधे सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वर पाय अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.

Story img Loader