मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू असले तरी, आठ ते दहा जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. काही जागांचा वाद मिटविण्यासाठी २ फेब्रुवारीला मुंबईत आघाडीची बैठक होणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.
जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख तीन पक्षांच्या बैठका सुरू आहेत. आतापर्यंतच्या बैठकांमध्ये राज्यातील ४८ पैकी ३६ ते ३८ जागांवर सहमती झाल्याचे समजते. दहा-बारा जागांचा वाद आहे. त्यापैकी सहा जागांवर काँग्रेस व शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त चंद्रपूर या एका जागेवर विजय मिळाला होता. परंतु आता या पक्षाने सर्वाधिक जागांवर दावा केल्याचे कळते. शिवसेनेने जिंकलेले रामटेक, शिर्डी, हिंगोली, दक्षिण मुंबई हे मतदारसंघ काँग्रेसला हवे आहेत. शिवसेना जिंकलेल्या जागा असल्याने त्यावरील हक्क सोडायला तयार नाही. या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार शिवसेना शिंदे गटात गेले आहेत, त्यामुळे त्या जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडायला काँग्रेस तयार नाही.
हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षणाबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ तक्रार
काँग्रेसचा आग्रह त्याचबरोबर भिवंडी मतदारसंघावरही काँग्रेस व शिवसेनेने दावा केला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती. त्यावेळी अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला होता. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पािठबा दिला होता. ही जागा आता राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेस तयार नाही. वर्धा मतदारसंघावरही काँग्रेसने दावा केला आहे. मुंबईत लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. मुंबईतही काँग्रेस व शिवसेना यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. मात्र मुंबईतील अधिकच्या जागा शिवसेनेला देऊन इतर विभागातील जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.