मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) गटात जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याचे सूत्र निश्चित करण्यात आले. यानुसार काँग्रेस १०५, शिवसेना (ठाकरे) ९५ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८५ जागा लढविण्यावर सहमती झाली आहे. पण जागावाटपावरून काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये बैठकीत पुन्हा ताणाताणी झाल्याचे समजते.
अजूनही चार-पाच जागांवर अजून सहमती झालेली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलतात जवळपास चार तास चर्चा झाली. गेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात वाद झाला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आज पुन्हा बैठक पार पडली.
हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?
विशेषत: विदर्भातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील काही जागांवरही दोन्ही बाजूने ताणले गेल्याने परत चर्चा करण्यात येणार आहे. जागावपाटपात काँग्रेस १०५, शिवसेना ९५ तर राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागांच्या दरम्यान जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. जागावाटपाची अधिकृत घोषणा महाविकास आघाडीकडून बुधवारी पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला.
विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून अजूनही चर्चा सुरू असल्याचे पटोले यांनी सांगितले. आजच्या बैठकीतही काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
मुंबईतील जागांवर चर्चा बाकी पटोले
विदर्भ आणि मुंबईतील जागांवर अजूनही चर्चा सुरू असून बुधवारी दुपारपर्यंत तोडगा काढला जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीतही काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.