भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात मित्रपक्षातील कोणालाही स्थान न दिल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पडत्या काळात आम्ही भाजपला मदत केली. मात्र, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आम्हाला संधी मिळाली नाही, याबद्दल वाईट वाटते, असे त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपने राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी पक्ष आणि शिवसंग्राम संघटना यांच्यासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणुकीत केवळ रासपचा एक उमेदवार विजयी झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातून रासपचे राहुल कुल यांना विजय मिळाला होता. मात्र, उर्वरित एकाही पक्षाला निवडणुकीत यश मिळाले नाही. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे १३ उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. त्याचवेळी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनाही बीड विधानसभा मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले होते. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व उमेदवारही निवडणुकीत पराभूत झाले होते.
निवडणुकीपूर्वी भाजपने सर्व मित्रपक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगून जानकर म्हणाले, राज्यातील ८७ मतदारसंघांमध्ये आमच्या मतांचा फायदा भाजपला झाला आहे. पण पहिल्या मंत्रिमंडळात आम्हाला वाटा देण्यात आलेला नाही. याबद्दल वाईट वाटते.

Story img Loader