मुंबई : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होत आहे. रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज येथे दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवर लावलेल्या स्कॅनरद्वारे तिकीट काढू शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांत देशातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास योग्यरित्या व्हावा यासाठी उत्तर मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर प्रचंड रांगा लागण्याची शक्यता होती. त्यामुळे भाविकांना सहजरित्या रेल्वे तिकीट काढण्यासाठी यूटीएस ॲपबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी यूटीएस ॲपचा क्यूआर कोड लावण्यात आला आहे.

हेही वाचा…वायुप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकामावरील निर्बंध कायम, भायखळा परिसराच्या पाहणीअंती भूषण गगराणी यांची स्पष्टोक्ती

मात्र, प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोड लावणे शक्य नाही. प्रवासीही क्यूआर कोडबाबत अनभिज्ञ असतील. त्यामुळे जिथे रेल्वे कर्मचारी उभा असलेल्या ठिकाणीच प्रवाशांना क्यूआर कोड उपलब्ध करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचारी हिरवे जॅकेट परिधान करणार असून जॅकेटच्या मागील बाजूस एक क्यूआर कोड लावण्यात आला आहे. या हा क्यूआर कोड मोबाइलवरून स्कॅन करून यूटीएस ॲप डाऊनलोड करता येणार आहे. प्रवाशांना रांगेत उभे न राहता या ॲपवरून अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि लांबलचक रांगा टाळून भाविकांना सहज तिकीट काढता येईल. डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढण्याची ही प्रक्रिया प्रवाशांच्या वेळेची बचत करेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh mela is held at prayagraj attracting lakhs of devotees arriving by rail innovative initiative launched to simplify ticketing process mumbai print news sud 02