मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने ‘सीएनजी’ आणि घरगुती ‘पीएनजी’च्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आजपासून (मंगळवार, ९ जुलै) अमलात आले आहेत. ‘सीएनजी’ प्रति किलो दीड रुपयांनी, तर ‘पीएनजी’ एक रुपयाने महाग झाला आहे. मुंबईकरांना नव्या दरानुसार एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा ‘सीएनजी’वर चालत असल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, ‘पीएनजी’ दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं अंदाजपत्रकही कोलमडू शकतं.
महानगर गॅस लिमिटेड कंपनीने म्हटलं आहे की सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढवले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी ५० टक्के स्वस्त आहे तर पीएनजी जवळपास ८० टक्के स्वस्त आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत किरकोळ वाढ केलेली असूनही आमच्या किंमती देशातील इतर शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या सीएनजी आणि पीएनजीच्या तुलनेत कमी आहेत.
दरम्यान, मुंबईकर रेल्वे आणि बसनंतर प्रवास करण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीचा सर्वाधिक वापर करतात. शहर आणि उपनगरात सीएनजीवर आधारित हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालतात. मात्र, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Hit and Run Case : अपघातानंतर महिलेला दीड किमी नेलं फरफटत अन् अंगावर…! आरोपीच्या कृत्याचे CCTV फुटेज समोर!
सीएनजी आणि पीएनजीची मागणी वाढली आहे, तसेच मागणीच्या तुलनेत या गॅसचा पुरवठा कमी असल्यामुळे एमजीएलला बाजार मूल्याच्या आधारावर अधिक किंमती मोजावी लागत आहे. खर्च वाढल्यामुळे कंपनीला सीएनजी आणि पीएनजीची विक्री अधिक दराने करावी लागत आहे.