मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकरण आणि दळणवळण अधिक सुकर करण्यासाठी महारेलने (एमआरआयडीसी) विविध योजना आखल्या जात आहेत. विशेष म्हणजे महारेलने अवघ्या दोन वर्षात संपूर्ण राज्यभरात ३२ रेल्वे उड्डाणपुलांची बांधणी करून ते नागरिकांच्या सेवेत उपल्बध करण्याची कामगिरी केली आहे. येत्या वर्षभरात आणखी २५ उड्डाणपुलांचे बांधकाम करण्याचेही नियोजन महारेलने केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने लवकरच मुंबईतील रे रोड येथे बांधण्यात येणारा रेल्वे उड्डाणपूल मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे वाहतुकीस अडथळा येऊ न देता महारेलने राज्यभरातील ३२ रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची कामगिरी पार पाडली आहे. शासकीय मंजुरी प्राप्त करणे, तुळई स्थापनेसाठी वेळोवेळी रेल्वे ब्लॉक घेणे, कमीत कमी जागेत काम करण्याचे आवाहन पेलत महारेलने हे रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. साधारणपणे एक उड्डाणपूल बांधण्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. मात्र, महारेलने दोन वर्षात युद्धपातळीवर हे ३२ उड्डाणपूल बांधून नागरिकांसाठी खुले केले. स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी नागपूर, उमरेड, पुणे, नाशिक, कराड, दोडाईचा, भुसावळ, कल्याण, सोलापूर आणि नांदेड येथे क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत.

महानगरपालिकेने मुंबईतील ब्रिटिशकालीन व मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीची जबाबदारी महारेलकडे सोपवली आहे. सद्यस्थितीला रे रोड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे व लवकरच हा पूल मुंबईकरांसाठी खुला करण्याचा महारेलचा मानस आहे. दरम्यान, दादर, भायखळा, घाटकोपर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाणपुलांच्या बांधणीच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे.दरम्यान, राज्यभरात जवळपास २०० रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम महारेलकडे सोपविण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालय, रेल्वे वाहतूक आणि आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्राचे नागरी विकास विभाग, मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदींच्या सहकार्यातून राज्यभरात रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. नागपुरातील ब्रिटिशकालीन अजनी पूल पाडून त्याठिकाणी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम महारेलमार्फत सुरु आहे. याशिवाय, मोमीनपुरा येथे रेल्वे उड्डाणपूल आणि नागपूरच्या मध्य व पूर्व भागात भुयारी मार्ग बांधण्याचे कामही महारेलने हाती घेतले आहे.