‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (‘महारेल’) रेल्वेच्या हद्दीत शिवडी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक त्या प्राथमिक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून अंतिम मजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी, भविष्यात नवी मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्यांना या उड्डाणपुलावरून शिवडीमार्गे वरळी आणि त्यापुढे झडपट जाणे शक्य होणार आहे.
रेल्वेच्या हद्दीतील सर्वात उंच पूल असणार –
‘एमएमआरडीए’ने शिवडी उड्डाणपुलाचे काम ‘महारेल’ला सुपूर्द केले आहे. हा उड्डाणपूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी-वरळी उन्नत मार्गिकेचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती ‘महारेल’मधील एका अधिकाऱ्याने दिली. या उड्डाणपुलासाठी आवश्यक अशी काही किरकोळ कामे हाती घेण्यात आली आहेत. केबल, पाइप अन्यत्र स्थलांतरित करणे, मातीचे ढिगारे, उत्खनन इत्यादी कामे सुरू करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. या उड्डाणपुलावर स्टील गर्डर बसविण्यात येणार असून त्याचा फेब्रिकेशनच्याही कामांना सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीतील महत्त्वाच्या कामांसाठी मध्य रेल्वेची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवडी उड्डाणपूल हा रेल्वेच्या हद्दीतील सर्वात उंच पूल असणार आहे.
उड्डाणपुलाची माहिती देणारे काही प्रमुख मुद्दे –
- दोन स्टील गर्डर उभारणी
- ‘एमएमआरडीए’ची मान्यता, तर मध्य रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा
- उड्डाणपुलासाठी ४५ कोटी रुपये खर्च
- मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर १५ महिन्यात बांधकाम पूर्ण
- उड्डाणपुलावर चार मार्गिका
- लांबी – ८२ मीटर, रुंदी – १८.०५ मीटर
- खांबांची उंची – अंदाजे. २२ मीटर