नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात महाराष्ट्रातील सुमारे ८००च्या आसपास पर्यटक अडकले असून हे पर्यटक सुखरूप आहेत. काही पर्यटक परतीच्या मार्गावर असून काहींची व्यवस्था नेपाळमधील सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.
नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा प्रत्येक जिल्ह्य़ात शोध घेतला जात असून स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यास राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील ८०० पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याचे आढळून आले असून आणखी काही पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. वीणा वर्ल्ड पर्यटन कंपनीचे ४८ प्रवासी लखनऊमधून परतीच्या मार्गावर निघाले आहेत. तसेच नाशिकमधील ५५ र्पयटक नेपाळमध्ये अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आपत्कालीन नियंत्रण विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी दिली. पुण्यातील ८४ पर्यटक लखनऊपर्यंत पोहोचले असतानाच भूकंप झाल्याने ते माघारी निघाले आहेत. मुंबई आणि पुण्यातील ३२ पर्यटक काठमांडूत अडकले असून ते सुखरूप असल्याचेही त्यांनी सांगितले.
केसरी टूर्सचे पर्यटक सुखरूप
केसरी टूर्सतर्फे महाराष्ट्रातील सुमारे ५६ पर्यटक नेपाळला गेले होते. काठमंडूमधील एका हॉटेलमध्ये असताना भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हे सर्व पर्यटक तातडीने बाहेर आले. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत, असे केसरी टूर्सचे शैलेश पाटील यांनी सांगितले. खबरदारी म्हणून या सर्व पर्यटकांना मोकळ्या मैदानातच ठेवण्यात आले आहे. यातील वयोवृद्ध २६ पर्यटकांना हवाई दलाच्या विमानाने दिल्ली येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंतर इतरांना आणले जाईल. काठमांडू येथे व्हॉट्सअप आणि दूरध्वनी सेवा सुरू असल्याने आपल्या पर्यटकांशी सहज संपर्क साधता आला, असे पाटील यांनी सांगितले. भूकंपाच्या वृत्तानंतर काठमांडूसाठी रवाना झालेल्या १०६ पर्यटकांना परत आणण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
.. तरीही जाण्याचा हट्ट
चौधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून आणखी काही पर्यटक शनिवारी गोरखपूरहून नेपाळच्या दिशेने निघाले आहेत. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती या पर्यटकांना देण्यात आली होती. मात्र, पर्यटकांनी आम्हाला नेपाळमध्ये जायचेच आहे असा हट्ट धरला. त्यामुळे तीन गाडय़ा नेपाळच्या दिशेने रवाना करण्यात आल्या, असे चौधरी यांनी सांगितले. भूकंपानंतर काठमांडूत ठिकठिकाणी ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. मात्र, अन्य कुठल्याही अडचणी नसल्याने अजूनही पर्यटकांना नेपाळमध्ये प्रवेश दिला जात आहे. एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल असा विश्वास तेथील उच्चपदस्थ अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मात्र, शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सुमारे दीडशे पर्यटकांना नेपाळमध्ये प्रवेश दिल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
ईशा टुर्सतर्फे ठाण्यातील १६ पर्यटक पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावर असताना भूकंपाचे हादरे बसले आणि विमानतळावर एकच धावपळ उडाली. मात्र काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली आणि सर्व काही ठीक असल्याचे विमानतळावरील प्रवाशांच्या लक्षात आले. आता ठाण्यातील १६ पर्यटक तेथील एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील गुरुमारा नॅशनल पार्कमध्ये ठाण्यातील १० पर्यटक सफर करीत होते. त्याच दरम्यान नेपाळ आणि उत्तर भारतातील परिसर भूकंपाने हादरला. मात्र त्याच वेळी हे पर्यटक प्रवास करीत होते. त्यामुळे त्यांना भूकंपाचे हादरे जाणवले नाहीत. मात्र मोबाइलवर हे वृत्त समजताच या पर्यटकांना सुखरूपपणे हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले, अशी माहिती ईशा टुर्सचे आत्माराम परब यांनी दिली.
महाराष्ट्रातील ८०० पर्यटक अडकले
नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात महाराष्ट्रातील सुमारे ८००च्या आसपास पर्यटक अडकले असून हे पर्यटक सुखरूप आहेत. काही पर्यटक परतीच्या मार्गावर असून काहींची व्यवस्था नेपाळमधील सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2015 at 01:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 800 tourists stranded in nepal