राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाने सरकारला जाब विचारला असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सरकारला अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. वीज कनेक्शनचा मुद्दा, राज्यातील करोनाची परिस्थिती, मंदिरांमध्ये लागू असलेले नियम अशा अनेक मुद्द्यांवर बोलतानाच देवेंद्र फडणवीसांनी दारूबंदी आणि वरळीतील नाईट क्लबमधून मनसेनं केलेल्या फेसबुक लाईव्हच्या मुद्द्यावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी ‘नारायण भंडारी’ची गोष्ट सांगून फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला देखील हाणला.

“आता वैध दारूविक्रीला विरोधच होईल”

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यात उडालेल्या दारूबंदीच्या फज्जावर बोट ठेवलं. “मेळघाटमध्ये महाकाली मुलींच्या वसतीगृहात मद्याचा कारखाना सापडला. हल्ली अवैध दारूचं कॉर्पोरेटायझेशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अवैध दारूविक्री केली जात आहे. त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अजितदादा, आता तुम्ही वैध दारूविक्री सुरू करायचं ठरवलं, तर त्याला तिथे मोठ्या प्रमाणावर विरोध होईल. दारूबंदी करण्यासाठी सगळे उभे राहतील. कारण अवैध दारूचे कारखानेच मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मनसेच्या फेसबुक लाईव्हवरून लगावला टोला!

मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या कमला मिलमध्ये एका नाईट क्लबमधून फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्या क्लबमध्ये कुणीच मास्क कसं घालत नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडाला आहे, हे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये दाखवलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाईट क्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाईव्ह केलं. ११ वाजेनंतर बंद वगैरे नियम इतरांकरता आहेत. कमला मिलमध्ये यो क्लब, प्रिन्स बारमधून फेसबुक लाईव्ह झालं. तिथे असलेल्या लोकांनी कुणीही मास्क लावला नव्हता. तिथे कोविड होत नाही. कोविड मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये होतो. हे बार कुणाच्या आशीर्वादाने चालतायत?” असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.

फडणवीसांनी सांगितली नारायण भंडारीची गोष्ट!

यावेळी राज्य सरकारला खोचक टोला लगावताना फडणवीसांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्राचा किस्सा सांगितला! फडणवीस म्हणाले, “हे सरकार मला नारायण भंडारीसारखं वाटतंय. एकदा शाळेचा मॉनिटर निवडण्यासाठी मास्तरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्याला विचारलं, शाळा सुटल्यावर काय करतो? तर तो म्हणाला, नारायण भंडारीच्या घरी जातो आणि वडिलांसाठी भांगेची गोळी नेतो. दुसरा विद्यार्थी म्हणाला, शाळा सुटल्यावर नारायण भंडारीकडे जाऊन वडिलांसाठी हातभट्टीची दारू नेतो. तिसरा विद्यार्थी म्हणाला, नारायण भंडारीकडे जाऊन चिलीम घेऊन जातो. चौथा विद्यार्थी म्हणाला मी घरी जाऊन हातपाय धुतो, देवपूजा करतो, प्रार्थना करतो आणि अभ्यासाला बसतो. गुरुजी म्हणाले, यालाच मॉनिटर करायचं. गुरुजींनी विचारलं काय नाव तुझं? तर तो विद्यार्थी म्हणाला मी नारायण भंडारी!”

ठाकरे सरकारने चौकातलं भाषण राज्यपालांकडे पाठवलं – देवेंद्र फडणवीस

Story img Loader