Ghatkopar East Constituency Parag Shah Maharashtra Richest Candidate: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. यावेळी उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. यात अधिक लक्षवेधी ठरले आहेत ते भाजपाचे घाटकोपर पूर्वमधून उभे असलेले उमेदवार पराग शाह. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
२०१९ मध्ये पराग शाह यांनी त्यांची संपत्ती ५००.६२ कोटी असल्याचे जाहीर केले होते. परंतु, आता २०२४ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ३३०० कोटी एवढी प्रचंड संपत्ती दाखविली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत पराग शाह यांची संपत्ती तब्बल ५७५ टक्क्यांनी वाढली आहे.
कोण आहे पराग शहा?
घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून पराग शाह भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांचा व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपरचा आहे. त्यांचे गृहनिर्माण प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये आहेत. पराग शाह हे मुंबई मनपाचे नगरसेवकसुद्धा होते. मनपा निवडणुकीत ते २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून विजयी झाले होते.
अशी होणार लढत
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात पराग शाह विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पराग शाह विरोधात मविआच्या राखी जाधव उमेदवार आहेत. राखी जाधव या मुंबई मनपाच्या माजी नगरसेविका आहेत.
हेही वाचा >> चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही
दुसऱ्या क्रमांकावर मंगलप्रभात लोढा
तर श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मंगलप्रभात लोढा हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी रुपये आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१.६५ कोटी रुपयांची संपत्ती होती. पाच वर्षांत त्यात साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लोढा यांच्याकडे २१८ कोटी रुपयांची स्थावर आणि २२८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लोढा हे मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी १९८० मध्ये मुंबईत लोढा ग्रुपची स्थापना केली होती, जी कंपनी आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स म्हणून ओळखली जाते. श्रीमंतीच्या बाबतीत लोढा यांच्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) प्रताप सरनाईकांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे ३३३.३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.