मुंबई : मतदानाकडे तरुणाईचा कल कमी असताना घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी एकत्रित मतदान केले. राज्याच्या विकासासाठी सर्वांनी मतदान करायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले. घाटकोपरमधील राजावाडी येथील चित्तरंजन क्रीडांगण येथे दुपारी १२.३० च्या सुमारास बाबुराव दगडू वाणी (९२) यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र प्रकाश वाणी (६३) आणि त्यांचा नातू आदित्य वाणी (३०) यांनीही मतदान केले.
हेही वाचा >>> वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; कोणी व्हिलचेअरवरून, तर कोणी वॉकर घेऊन मतदान केंद्रात दाखल
आजोबा, मुलगा आणि नातू या तिघांमध्ये ३० वर्षांचे अंतर आहे. मतदान आपले कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावायलाच हवे, असे मत बाबुराव वाणी यांनी व्यक्त केले. आजोबा सकाळपासून मतदान करण्यासाठी मागे लागले होते. आपण ११ वाजता मतदान करायचे आहे, असे सांगत सर्वांना मतदान करण्यासाठी घेऊन आले आहेत. मतदान आपले हक्कचे नसून कर्तव्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे आदित्य वाणी यांनी सांगितले. आमच्या तिन्ही पिढ्यांनी मतदान करून सध्याच्या तरुणाईसमोर एक आदर्श ठेवल्याचे प्रकाश वाणी यांनी सांगितले.