मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मतदान सुरू असून मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ही तरुणाईला प्रेरित करणारी ठरत असून बहुसंख्य  वृद्ध मतदार मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. तसेच महापालिकेने विविध सुविधा उपलब्ध केल्यामुळे दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रातील उपस्थिती लक्ष वेधून घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर मतदान सुरू आहे. सध्या मुंबईतील मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती कौतुकास्पद ठरत आहे. अनेक वृद्ध मंडळी अतिशय उत्साहाने कोणी व्हिलचेअरवरून तर कोणी वॉकर घेऊन, तर कोणी काठीचा आधार घेऊन मतदान केंद्रांवर हजर होत आहेत. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील बालमोहन विद्या मंदिर या शाळेतील मतदान केंद्रावरही ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मतदारांना निवडणूक केंद्रांवर नेण्यासाठी कार्यकर्त्यांची कसरत

कुटुंबिय, पोलीस तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (एनएसएस) स्वयंसेवक विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थितपणे प्रवेशद्वारापासून मतदान खोलीपर्यंत नेले जात आहे. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. मुंबईतील विविध मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पुरुष व स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळी रांग आणि त्याठिकाणी पंखे, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था, प्रतीक्षा कक्ष आदी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ’मी वयाच्या १८ व्या वर्षापासून मतदान करीत आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावणे सोडले नाही. आज मी व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आले आणि मतदानाचा हक्क बजावला’, असे मत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात राहणाऱ्या ९० वर्षीय मतदार कमल पेठे यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 voting in mumbai constituency presence of youth and senior citizens at various polling stations mumbai print news zws