मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल ९ कोटी ७० लाख मतदार नोंदणी झाली असून लोकसभेच्या तुलनेत त्यात ५० लाखांची भर पडली आहे. गेल्या दोन आठवड्यांत सात लाख नव्या मतदारांनी नोंद केली आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिह्यात असून नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त
u
निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभेची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती. त्या वेळी राज्यात ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि चार कोटी ६६ लाख महिला, ६ हजार ३१ तृतीयपंथी असे एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार मतदार होते. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या काळात ७ लाख नवीन मतदारांनी नोंद केल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. एप्रिल-मे दरम्यान पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी वेळी राज्यात सुमारे ९ कोटी २० लाख मतदार होते. त्या तुलनेत सुमारे ५० लाख मतदार वाढले आहेत. या वेळी २२ लाख २२ हजार नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ६ लाख ४१ हजार विकलांग तर एक लाख १६ हजार सेनादलातील मतदार आहेत. १०० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ४७ हजार ३९२ आहे. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. सर्वाधित ८८ लाख ४९ हजार मतदार पुणे जिह्यात असून त्या खालोखाल ७६ लाख २९ हजार मतदार मुंबई उपनगर, ७२ लाख २९ हजार मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. सर्वांत कमी ६ लाख ७८ हजार मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. ठाणे जिह्यात सर्वाधिक १४१५ तृतीयपंथी मतदार आहेत.