विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले, शिवीगाळ केल्याचा मिटकरींचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भरत गोगावले यांचा इशारा –

“आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. करोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं झाल्यानंतर पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही. कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु, पण कोणी आम्हाला पाय लावण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असंही ते म्हणाले.

Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

तुम्हाला धक्काबुक्की झाली का? असं विचारलं असता ते म्हणाले “अरे हाड! ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली”.

अजित पवारांचा टोला

“५० ओके एकदम ओके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली. ते नाराज झाले असल्यानेच आज त्यांच्यातील काही आमदार येथे आले असून, घोषणा देत आहेत. विधीमंडळात अशा गोष्टी घडत असतात. पण त्यांच्या वागण्यातून मनाला लागलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly monsoon session shinde camp mla bharat gogavle on ruckus with opposition mla sgy
Show comments