मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वर्तन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून गोंधळ झाल्याने सोमवारी विधानसभेचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले. उद्या मंगळवारी याबाबत निर्णय घेण्याची ग्वाही पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षपार्ह टीकेमुळे नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोमवारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी राणे यांनी सभागृहात माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करीत विधानसभेचे कामकाज रोखले. सुहास कांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेकडे सभागृहाचे लक्ष वेधतांना ठाकरे घराण्यांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला. तर राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सु्नील प्रभू व अन्य सदस्यांनी केली. यावेळी भास्कर जाधव यांनीही युतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १९ आमदारांच्या निलंबनाचा दाखल देताना तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी जोरादार आक्षेप घेतला. फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारतानाच आणखी एका आमदाराला निलंबित करण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत रडणारे नाही असा टोला लगावला. सभागृहाबाहेर जी काही घटना घडली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण ठरवून सदस्याला निलंबित करणे हे लोकशाहीत योग्य नाही, असे त्यांनी सांगितलं.
सरकारे बदलत असतात. पायंडा पाडला तर येणारे सरकार कोणत्याच विरोधकांना ठेवणार नाही. लोकशाहीची हत्या होईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. यावेळी शिवसेना आणि भाजप सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत धाव घेत घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने पिठासन अधिकारी संजय शिरसाट यांनी ‘ आपला गोंधळ महाराष्ट्र पाहतोय’ याची आठवण करून देत शांत केले.
‘सुडाच्या राजकारणातून नितेश राणेंच्या अटकेचा प्रयत्न’
नागपूर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सत्तारूढ लोकांना पराभव दिसू लागल्याने सुडाचे राजकारण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित केले जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. अॅग्रोव्हिजनच्या कार्यक्रमाला नागपुरात आले असता ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. कोणाच्याही मारहाणीशी नितेश राणे यांचा संबंध नाही. राज्य सरकारला जे करायचे ते करू द्या. नितेश राणे जिल्ह्यात आहेत. आम्हाला अज्ञातवासात जाण्याची काही आवश्यकता नाही. पण अशाप्रकारे सुडाच्या भावनेतून कारवाई झाल्यास त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही राणे म्हणाले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. या मारहाणप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव घेतले जात आहे.