विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आसनव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन वाद झाला. या वादामध्ये अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करुन वाद मिटवावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झालं असं की, अनिल परब यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाच नितेश राणे यांनी जागेवरुन उठून त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावर परब यांनी तुमची प्रश्न विचारण्याची वेळ आली की प्रश्न विचारा असं सांगितलं. त्यानंतरही नितेश राणे ओरडून बोलत असल्याने परब यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना नितेश राणेंना समज द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर नितेश राणेंनी पुन्हा मोठ्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर परब यांनी नितेश राणे त्यांच्या जागेवर बसलेलं नसल्याचं म्हटलं. यावरुनच पुढे वाद वाढत गेला.

नक्की वाचा >> “रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”

नितेश राणेंना जागेवर पाठवण्यात यावं यावर परब आडून राहिले. आसनव्यवस्थेप्रमाणे त्यांना त्यांच्या जागी बसण्यासाठी पाठवावं अशी मागणी परब यांनी झिरवाळ यांच्याकडे केली. त्यानंतर झिरवाळ यांनी नितेश राणेंना आपली आसनव्यवस्था मागच्या बाजूने असल्याचं सांगितलं. “त्यांचा आसनव्यवस्थेचा क्रमांक काय आहे पाहून घ्यावा. तसेच सभापतींनी प्रश्न विचारण्यास परवानगी दिल्यानंतरच स्वत:च्या आसनावरुनच त्यांनी मला प्रश्न विचारावा,” असं परब म्हणाले.

झिरवाळ यांनाही राणेंना तुमची आसनव्यवस्था मागील बाजूस असल्याचं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील भूमिका मांडली. फडणवीस यांच्या मागच्या आसनावरच नितेश राणे बसले होते. तुम्ही आम्हाला आसन क्रमांक देता. कोण कुठे बसणार हे आम्ही ठरवतो, असं पक्षाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले. बराच वेळ हा गोंधळ सुरु राहिला. त्यानंतर फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. नितेश राणे यांनीही परब यांच्या उत्तरामध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित केला नाही. परब यांनी नंतर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session anil parab vs nitesh rane verbal fight over seat issue scsg