मुंबईत २००६ पासून झालेले विविध बॉम्बस्फोट आणि पुण्यातील जर्मन बेकरीच्या स्फोटासह आठ विविध गुन्ह्यांमध्ये यासिन भटकळचा सहभाग असून, त्याचा ताबा मिळावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने संबंधित न्यायालयात रितसर अर्ज केला जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
मुंबईत जुलै २००६ मध्ये उपनगरीय रेल्वे गाडीत झालेल्या बॉम्बस्फोटासह दोन वर्षांंपूर्वी मुंबईत झवेरी बाजारसह विविध झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार यासिन भटकळ होता. तसेच पुण्यातील बॉम्बस्फोटांमध्येही भटकळचा सहभाग होता…
आठ विविध गुन्ह्यांमध्ये भटकळ पोलिसांच्या नोंदी फरार होता. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक भटकळला झालेली अटक हे केंद्रीय तपास यंत्रणांचे मोठे यश आहे. त्याचा ताबा मिळावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. दहशतवाद विरोधी विभागाचे एक पथक चौकशीसाठी नवी दिल्लीला रवाना होणार आहे. मूळचा कर्नाटकचा असलेल्या भटकळने मुंबईत काही काळ वास्तव्य केले होते. तसेच मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याकरिता त्याने विविध संवेदनशील भागांची पाहणीही केली होती. पुण्यातील दगडूशेठ मंदिराच्या आसपास घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने त्याने कट केला होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्यात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकांमध्ये भटकळ बंधू तसेच पडघ्यातील साकिब नाचण याने महत्त्वाची भूमिका बजाविल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. मराठवाडय़ातील तरुणांना जाळ्यात ओढण्यात भटकळ हा सूत्रधार होता…
* हैदराबादेत २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी यासिन भटकळ आणि त्याचा सहकारी असदुल्ला यांची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेशातील पोलिसांचे पथक बिहारला रवाना होणार आहे.
* २००८ मध्ये अहमदाबादेत झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि इतर विविध ३५ गुन्ह्य़ांसाठी गुजरात पोलिसांनी यासिनचा ताबा मागितला आहे.
* बंगळुरूतील महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणात कर्नाटक पोलिसांना यासिनचा ताबा हवा आहे. त्याच्यावर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत.
यासिनचा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्राची खटपट
मुंबईत २००६ पासून झालेले विविध बॉम्बस्फोट आणि पुण्यातील जर्मन बेकरीच्या स्फोटासह आठ विविध गुन्ह्यांमध्ये यासिन भटकळचा सहभाग असून, त्याचा ताबा मिळावा
First published on: 30-08-2013 at 03:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ats to seek yasin bhatkals custody rr patil