सर्व शिक्षा अभियान, माध्यान्ह भोजन योजना यासारख्या केंद्र शासनाच्या निधीतून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीकडे शिक्षण विभागाचे साफ दुर्लक्ष झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यावर पुरेसा खर्चही झालेला नाही. या आर्थिक वर्षांत एकही नवी वर्गखोली बांधली गेलेली नाही, संगणक प्रयोगशाळांच्या उभारणीकडेही साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावणार, विद्यार्थ्यांना साधनसुविधा उपलब्ध करून देणार, अशा राज्य शासनाच्या घोषणा केवळ ‘फुकाच्या’ ठरल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
शाळा नसलेल्या भागांमध्ये नवीन शाळा सुरू करणे, शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे बांधणे, पिण्याचे पाणी पुरविणे, देखभालीसाठी अनुदान देणे, अशा पायाभूत सुविधांसाठी सर्व शिक्षा अभियान योजनेतून केंद्र सरकार निधी देते. त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राची नियमावली आहे. मात्र या योजनेचा वापर करून शाळांचा दर्जा उंचावण्याकडे आणि विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे शालेय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.
सर्वशिक्षा अभियानासाठी २०१२-१३ मध्ये सुमारे १४८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर २०१३-१४ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारीपर्यंत केवळ ८६१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या वर्षांत ५३१९ वर्गखोल्या बांधण्यात आल्या. पण यावर्षी एकही वर्गखोली बांधण्यात आली नाही. गेल्या वर्षी ७४३ संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. यावर्षी केवळ १२९ संगणक प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षी एक कोटी ३३ लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली गेली. ही संख्या यावर्षी एक कोटी २८ लाखांवर आली. शिक्षकांची संख्याही गेल्यावर्षीपेक्षा ९ हजाराने कमी झाली असून सध्या तीन लाख ५६ हजार शिक्षक सेवेत आहेत.
माध्यान्ह भोजन योजनेसाठी गेल्यावर्षी एक हजार २४४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. तर या वर्षांत डिसेंबर २०१३ पर्यंत फक्त ५८३ कोटी रुपये खर्च झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा