मुंबई : बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी अडीच वाजता ठेवली आहे. मात्र, अशा राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरणांत न्यायालयाला ओढू नये, असेही सुनावले. त्याचवेळी, युक्तिवादाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा राजकीय आरोप करु नये, असे देखील न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बजावले.
महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बंद पुकारला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहता अशा बंदना विशेषतः मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, सर्वसामान्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे, न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करावा आणि हा बंद बेकायदा जाहीर करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.
न्यायालयाने मात्र हे सगळे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून न्यायालयाला यात ओढू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे, राज्य सरकार सगळी स्थिती हाताळण्यास समर्थ असल्याचे म्हटले.
परंतु, आधीचे अनुभव लक्षात घेता न्यायालयाने सर्वसामान्य नागरिकांसाठी याचिका ऐकण्याची आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. त्यानंतर, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दाखवली आणि सरकारने उद्याच्या बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी काय तयारी केली हे त्यावेळी सांगण्याचे आदेश दिले.