Maharashtra Band August 24: बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद विरोधात काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या बंदला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या बंदबद्दल माहिती दिली. उद्याचा बंद कडकडीत असणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान रेल्वे सेवा आणि बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही, असे विधान त्यांनी केले.
महाराष्ट्र बंद हा ‘विकृती विरुद्ध संस्कृती’
बंदबद्दल माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी आहे. आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृतीविरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश – अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. आपल्या माता-भगिनींची सर्वांना चिंता आहे, हे सरकारला दाखवून दिले पाहीजे.
हे वाचा >> Maharashtra News Live : “उद्याचा बंद हा राजकीय नाही, तर…”; उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका
उद्या काय काय बंद राहणार?
उद्याचा बंद फक्त महाविकास आघाडीच नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात, धर्म, पंथ, भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावे. कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे २४ ऑगस्टचा बंद दुपारी २ वाजेपर्यंतच पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा >> उद्याच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयात आव्हान…
रश्मी शुक्लांना लाडकी बहीण होण्याची संधी
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. उद्याच्या बंदबाबत ही भेट होती, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या राज्याच्या लाडकी बहीण होऊ शकतात. हे त्यांनी उद्याच्या बंद दरम्यान दाखवून द्यावे. उद्याच्या बंदच्या आड पोलिसांनी दादागिरी करू नये. तसेच हट्टाने बंदचा फज्जा होईल, असे कृत्य करू नये. अन्यथा काही महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडविल्याशिवाय राहणार नाही.
बंद दरम्यान हिंसा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
ताजी अपडेट
मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शिवसेना भवनाच्या बाहेर तोंडाला काळी पट्टी बांधून बसणार आहे. जर तेही बेकायदेशीर असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयात जाईल.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केले आहे. “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे”, असे शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटले आहे.