महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची वर्णी लागणार की, भाजपच्याच कुणा खासदाला संधी मिळणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते देण्यात आले होते. जानेवारीमध्ये दानवे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे एक व्यक्ती एक पद या तत्त्वानुसार त्यांना मंत्रिपद सोडावे लागणार आहे.
त्यानुसार दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपण उद्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
दानवे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर रामदास आठवले यांची वर्णी लागेल, अशी चर्चा आहे. गेल्याच आठवडय़ात आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी त्यांच्याकडे मागणी केली होती, असे समजते. या संदर्भात दानवे यांनी आपल्या राजीनाम्यामुळे कुणाचे भले होणार, आठवले यांची इच्छा मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होणार का, असे विचारले असता, ते फक्त मोदी यांनाच माहित अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांच्या निधनामुळे राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी २० मार्चला निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे उमेदवार कोण असे विचारले असता, या संदर्भात ८ मार्चला पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असे दानवे यांनी सांगितले.   

Story img Loader