महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठबळामुळे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांची वर्णी विधानपरिषदेवर लागणार आहे. जोरदार रस्सीखेच झाल्यावर सोमवारी मध्यरात्री उशिरा वाघ यांच्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. विधानपरिषदेच्या चारपैकी तीन जागा शिवसेना व घटकपक्षांना गेल्यामुळे आणि भाजपच्या वाटय़ाला आलेल्या एका जागेवर वाघ यांची निवड झाल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पक्षाचे वर्षांनुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून घटकपक्षांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.
विधानपरिषदेच्या चार जागांपैकी एक जागा सुभाष देसाई यांना देण्याचे भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेताना कबूल केले होते. त्याचबरोबर घटकपक्षांनाही सत्तेतील सहभागाचा वाटा देण्याचे आश्वासन दिल्याने आणि त्यांना विधानसभेत यश न मिळाल्याने विधानपरिषदेची जागा देणे भाग होते. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कॅबिनेट मंत्रीपदही दिले जाणार आहे. विनायक मेटे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची साथ धरली होती. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. चौथ्या जागेसाठी भाजप नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा होती. मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खजिनदार शायना एन सी, सुजित सिंह ठाकूर यांच्या नावांची चर्चा होती. पण राज्यातील नेत्यांकडून भांडारी आणि शायना एनसी यांच्या नावाबरोबरच वाघ यांचे नाव आयत्या वेळी पाठविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत अनेकांशी चर्चा व भेटीगाठी सुरु होत्या. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही फडणवीस व दानवे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
वाघ यांच्यासाठी खडसे यांनी शिफारस केली होती. त्या गेली अनेक वर्षे पक्षाचे काम करीत असलेल्या महिला पदाधिकारी असल्याने आणि जळगावच्या असल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला यापैकी कोणाची तरी निवड करावी, असा आग्रह होता. त्यामुळे एका जागेसाठी मध्यरात्री उशिरापर्यंत जोरदार रस्सीखेच व स्पर्धा होऊन वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. खडसे यांच्या शिफारशीमुळे पक्षनेतृत्वाने त्यांची निवड केल्याचे समजते.

Story img Loader