राज्यात बहुजन समाज पक्षात (बसप) अखेर फूट पडली आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवायच्या नाहीत, हा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा आदेश झुगारून डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज परिषद नावाने बंडखोर गट जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्याकडील महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेतल्यामुळे पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. अनेक जिल्हय़ांतील विशेषत: विदर्भातील माने यांच्या समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे पक्षात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विदर्भ हा बसपचा गड मानला जातो. मात्र याच विभागात बसपमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन जिल्हय़ांतील पक्षाच्या सर्व स्तरांवरील समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समित्या निवडणुकीपासून दूर राहण्याचे बसपने ठरविले आहे. या संदर्भात राज्याचे प्रभारी खासदार वीरसिंग व प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या उपस्थितीत गेल्याच आठवडय़ात मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती.

Story img Loader