तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही तरतूद

मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्मारके आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासावर बराच निधी खर्च केला गेला. महाविकास आघाडी सरकारने ती परंपरा पुढे चालू ठेवली आहे. राष्ट्रपुरुषांबरोबर राजकीय नेत्यांच्या स्मारकांसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही खास तरतूद आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत १०० वर्षांपूर्वी अस्पृश्यता निवारण परिषद झाली होती. त्या स्मरणार्थ तेथे डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर दापोली येथे महर्षी थोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य विनोबा भावे यांचे एकत्रित स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, यांच्या नावे स्मृति भवन, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, आर.आर.पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई यांची स्मारके बांधली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्य़ात मंगळवेढा येथे संत चोखामेळा आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक, कोल्हापूर येथील शाहू मिलमध्ये शाहू महाराजांचे स्मारक, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांचे नाशिक जिल्ह्य़ात वासाळी येथे स्मारक, राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकांसाठी अर्थसंकल्पात ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्य़ातील माहूगड, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, नर्सी नामदेव, पाथरी, अंबरनाथ येथील प्राचिन शिवमंदिर, मिरज येथील हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा इत्यादी तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचे जाहीर करण्यात आले.

लंडनमध्ये डॉ. आंबेडकर अध्यासन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत शिक्षण घेतले होते, त्याला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. आंबेडरांच्या नावे अध्यासन सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Story img Loader