महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सकाळी ११ वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडतील. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असला तरी अजित पवार दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दोनच दिवसापूर्वी पार पडलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या देवेंद्र फडणवीस लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवारांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करताना घडलेला एक किस्सा सांगितला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन  मुंबईमध्ये करण्यात झाले. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पक्षांच्या नेत्यांबरोबरच अजित पवार यांनीही भाषण केलं. फडणवीसांबरोबर भाजपाच्या नेत्यांची पवारांनी आपल्या खास शैलीत फिरकी घेतली. यावेळेस त्यांनी एक जुनी आठवणही सांगितली. “पुस्तक योग्य वेळी उपलब्ध होतयं याचा आनंद आहे. या पुस्तकाचा उपयोग सर्वांना होणार आहे. सामान्य माणसासाठी सोप्या भाषेत अर्थसंकल्प कळावा म्हणून हे पुस्तक लिहिलयं. सहा तारखेला (राज्याच्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्या दिवशी) सामान्य माणसातल्या अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. हे पुस्तक सोप्या भाषेत असल्याने फडणवीस यांचं अभिनंदही सोप्या भाषेत करण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशा शब्दांमध्ये पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

अर्थसंकल्प सादर करत असताना…

देवेंद्रजी अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी भाषा सोपी करुन चालणार नाही. तर अर्थसंकल्प मांडण्याऱ्या अर्थमंत्र्यांचं ध्येय आणि दिशा स्पष्ट असावी लागते. त्याचा प्रधान्य क्रमही स्पष्ट असावा लागतो. मन देखील साफ आणि स्वच्छ असावं लागतं. महत्वाचं म्हणजे अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प लोकांच्या गरजांशी, भावनांशी एकरुप होऊन तयार होणं गरजेचं असतं असं मला वाटतं. अलिकडच्या मागील १५-२० वर्षांच्या कालावधीमध्ये जयंतराव पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा आम्ही सर्वांनी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अर्थसंकल्प राज्यामध्ये सादर केले. हे सगळं होत असताना मला एका गोष्टीची आठवण येते. अर्थमंत्री विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी सदस्यांनी सभागृहामध्ये गोंधळ न घालता तो शांततेत ऐकून घेतला पाहिजे अशी टीप टाकली आहे,” असं पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

त्यावेळी एकच माणूस…

अर्थसंकल्प मांडता सभागृहात होणाऱ्या गोंधळावरुन पवारांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडतानाची आठवण सांगितली. “मला आठवतय बरोबर सहा वर्षापूर्वी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहामध्ये मी माझा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना सगळे विरोधीपक्षाचे आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्यासमोरच्या विरोधी बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर ठेऊन अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा त्याच्यातील बारकावे लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. माझ्या मनाला इतकं वाईट वाटतं होतं की हे इतकं बारकाईने ऐकतायत थोडसं यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे. फडणवीस अतीशय शांतपणे ऐकत होते. तर मुनगंटीवार अगदी जोरजोरात घोषणा देत होते. गिरिष महाजन तर विचारुच नका. त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे. पुढं याच्याच हाताखाली काम करायचं आहे,” अशी टीप्पणी अजित पवारांनी केली. यानंतर सभागृहामधील सर्वच नेते हसू लागले.

Story img Loader